कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरासह तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी दि. 31मे रोजी रात्री 11 वाजता वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असल्याने पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु वीजेच्या कडकडाटामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. कराड शहरासह तालुक्यातील सुपने, तांबवे, तळबीड, वहागाव, कोळे, विंग भागात पावसाने हजेरी लावली.
महामार्गावर जोरदार पावसामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तर कोल्हापूर नाका येथे खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. तसेच गटारेही तुडुंब भरून वाहत असल्याने वाहन चालकांनी कसरत करावी लागत होती. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, तेव्हा लवकरात लवकर खड्डे मुजविण्याची मागणी केली जावू लागली आहे.