कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील
राज्य सरकारने सर्व सरकारी रुग्णालयात (Government Hospital) मोफत उपचाराची घोषणा केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. एकही रुपया खर्च नसल्याने आधीपेक्षा जास्त रुग्ण सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ लागले. सरकार मधील नेतेही आम्ही मोफत उपचार देतोय अस म्हणत स्वतःचा मोठेपणा सांगत आहेत. मात्र एकीकडे मोफत उपचार असताना दुसरीकडे त्याप्रकारच्या सोयी- सुविधा, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांची मात्र वाणवा आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात (Venutai Chavan Hospital karad) हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंताजनक ठरतोय अशी माहिती मिळताच हॅलो महाराष्ट्रने थेट रुग्णालयात जाऊन याबाबत आढावा घेतला. यात अस दिसून आले की सरकारची मोफत उपचार करण्याची योजना वरवर दिसायला जरी छान वाटत असली तरी ग्राऊंड वरची परिस्थिती मात्र एवढी सोप्पी नाही.
कराड येथील शासकीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंगूची साथ वाढल्याने यात आणखी भर पडली आहे. परंतु एकीकडे मोफत उपचार सुरू असतानाच दुसरीकडे सफाईच्या बाबतीत मात्र तीन तेरा वाजले आहेत. सध्या एकही सफाई कर्मचारी कामावर नसल्याने सर्वत्र धूळ आणि घाणीचे साम्राज्य दिसत आहे. याबाबत एका रुग्णाने तक्रारही केली. यानंतर आम्ही रुग्णालयातील कर्मचारी वर्ग आणि वैद्यकीय अधिक्षकांशी संवाद साधला असता वेगळंच सत्य समोर आले.
यापूर्वी रुग्णांकडून जे काही 5-10 रुपये तपासणी मिळायची, तसेच ब्लड टेस्ट, एक्सरे त्यातून जे पैसे जमा व्हायचे त्याच पैशातून आम्ही सफाई कर्मचाऱ्यांचे पगार भागवायचो मात्र आता सरकारने मोफत उपचार केल्याने सफाई कामगारांचे पगार भागवणे अशक्य बनलं आहे. परिणामी सर्वच्या सर्व सफाई कामगार काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती नाव न घेण्याच्या अटीवर काही वैद्यकीय अधिकाऱ्यानी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे शासकीय रुग्णालय असूनही सातत्याने कराडच्या वेणूताई उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण भरती होत असल्याने कर्मचारी वर्ग आणि सफाई कामगार यांच्या भरतीसाठी सातत्याने सरकारकडे तसेच सातारा सिव्हिल हॉस्पिटलकडे पत्रव्यवहार केला मात्र अद्यापही ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही अस अधीक्षकांनी सांगितले. येवडच नव्हे तर धक्कादायक गोष्ट म्हणजे कराड उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ इंचार्ज सुद्धा नाही.
वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी २४ कर्मचारी वर्ग आणि १४ सफाई कामगार होते. परंतु पगार देण्यासाठी पैसे नसल्याने सर्वच्या सर्व १४ सफाई कामगार कामावरून कमी करण्यात आले आहेत. आता सध्या एकूण १२ कर्मचारी वर्ग असून त्यांनाच सर्व कामे करावी लागत आहेत. महाराष्ट्र विकास ग्रुपच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांची भरती असा यासाठी सातत्याने सातारा सिव्हिल कडे निवेदन देऊनही अद्यापही भरती जाहीर झालेली नाही. गेल्या अनेक वर्षात नवीन भरती सुद्धा सरकार कडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा लोड येत आहेत. तसेच आम्हाला स्वतः दर शनिवारी सर्व हॉस्पिटल परिसरात सफाई करतो असं वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं.
सरकारच्या मोफत सुविधांच्या निर्णयामुळे सफाई कामगारांचे पगार भागवणे शक्य नाही त्यामुळे कामगारांना कामावरून कमी करावं लागले आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण हॉस्पिटल परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलं आहे. रुग्णांना बेडची सुद्धा व्यव्यस्थित अशी सोय नाही. त्यामुळे रुग्णांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकूण काय तर, सरकारने रुग्णालयातील उपचार मोफत केले असले तरी रुग्णालयात नेमकी स्थिती कशी आहे? सफाई कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? हॉस्पिटलमध्ये सर्व काही जिथल्या तिथे व्यवस्थित होतंय का? याकडे मात्र गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे