कराड | सेवा पंधरवडा या योजनेअंतर्गत, महसूल विभागामार्फत सेवा रथ सुरू करण्यात आला. या रथाची सुरूवात उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आली. कराड तहसील कार्यालयात तसेच तालुक्यातील प्रत्येक मंडलात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. महसूल विभागातील विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थीना देण्यात आला. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. ३० रोजी सर्व मंडल कार्यालयात फेरफार अदालत पार पडल्याची माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली आहे.
कराड येथे फेरफार अदालतीत प्रांताधिकारी उत्तम दिघे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर, सैदापूरचे फत्तेसिंह जाधव, रामकृष्ण वेताळ यांच्यासह मंडल अधिकारी उपस्थित होते. फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढण्याबरोबर शेतकरी खातेदारांच्या पीएम किसान योजनेच्या ई -केवायसी संबंधित प्रलंबित कामांवर कार्यवाही करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांना ई- पीक पाहणी करण्याबाबत योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
सेवा पंधरवड्यांतर्गत महसूल विभागासह, पी. एम. किसान योजना, नवीन शिधापत्रिका, संजय गांधी योजना व दाखले देण्यात आले. मतदार कार्ड आधार कार्डना लिंक करणे, नमुना ६ भरुन घेणे ही कामे करण्यात आली. सेवा रथाद्वारे इ पीक पाहणी, इ केवायसी, आधार लिंकिंग बाबत तालुक्यातील सर्व गावांत जनजागृती करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले.