कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील शिंदे गल्लीतील सागर शिंदे यांच्या ‘शिवकन्या’ रिक्षाची चक्क खासदार अमोल कोल्हे यांना भुरळ पडली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या खा. अमोल कोल्हे यांनी ही शिवकन्या रिक्षा पाहिली आणि ते त्या रिक्षाच्या प्रेमात पडले. कराड बस स्टॅन्डवर रिक्षात बसून अमोल कोल्हे यांनी रिक्षाची बसून माहिती घेतली.
सागर शिंदे यांच्या ‘शिवकन्या’ रिक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण करून दिली जाते. याबरोबरच या रिक्षावर चक्क गड- किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. संपूर्ण रिक्षाच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास सांगितला जातो. एवढेच नव्हे तर अंधश्रद्धा निर्मूलन समाज प्रबोधनही केले जात आहे. सर्व सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या या रिक्षाला पाहिल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनाही त्या रिक्षाची भुरळ पडली. त्यांनी स्वतः या रिक्षात बसून सागर शिंदे यांचे कौतुक केले. याबरोबरच शिवछत्रपतींच्या इतिहासाचे महत्त्व सांगत सागर शिंदे यांचे कौतुक व सत्कारही केला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती
ऐतिहासिक माहिती देणारी ही ‘शिवकन्या’ रिक्षात मराठा मावळ्याची फोटोसह माहिती देण्यात आली आहे. रिक्षावर गडाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. छ. शिवाजी महाराज यांची प्रतिकृती बसविण्यात आली आहे. तसेच सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत.