कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी 2007 सालापासून रखडलेली योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे. मात्र, आता पाणी बिलावरून ही योजना चर्चेत आलेली आहे. सदरची योजना गेल्या 15 वर्षापासून रखडलेली आहे. परंतु आता पूर्णत्वास जाताना पाणी बिलावरून नागरिक व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत. पाणीबिल संदर्भात नागरिकांच्या शंकेचे निरासन व चर्चा करण्यासाठी कराड पालिकेने दि. 27 जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे.
कराड शहरात गेल्या वर्षभरात ही योजना कार्यान्वित होण्या अगोदर मीटर प्रमाणे बिल आकारणी करण्यास सुरूवात केली गेली. सध्या, सकाळ व संध्याकाळ असे 2 वेळात मीटरप्रमाणे पाणी सोडले जात आहे. वर्षभरात 2 हजार रूपये येणारे पाणी बिल चक्क 10 ते 12 हजारांच्या घरात गेल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कराड पालिकेत प्रशासक असल्याने राजकीय पक्षांनीही मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन दिलेली आहेत. गेल्या 8 दिवसांत अनेक संघटना, राजकीय पक्षांनी पालिकेला निवेदन दिली.
त्यामुळे 15 वर्षापासून रखडलेली पाणी योजना पुढे कशी कार्यान्वित होणार याकडे शहर वासियांचे लक्ष आहे. पालिकेच्या सध्याच्या पाणी बिलावर दक्ष कराडकर, काॅंग्रेस, राष्ट्रवादी (लोकशाही आघाडी), बाळासाहेबांची शिवसेना यांनी आक्षेप घेत निवेदन दिली आहेत.
योजना व्हावी पण समस्यामुक्त, अन्यथा रस्त्यावर उतरणार : ऋतूराज मोरे
कराड पालिकेने पाणी प्रश्नाबाबत नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. शहरासाठी चोवीस तास पाणी योजना गरजेची आहे. परंतु त्याकरिता नागरिकांच्यावर अन्याय होता कामा नये. यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात. अन्यथा काॅंग्रेस नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल, असे काॅंग्रेसचे कराड शहर अध्यक्ष ऋतूराज मोरे यांनी सांगितले आहे.
समस्या सोडविल्या जातील, बिल माफी नाही : रमाकांत डाके
पालिकेला सध्या पाणी योजनेमुळे मोठा भुर्दंड बसला आहे. कोट्यावधी रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे पाणी बिल माफ होणार नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील. सदरची पाणी योजना 1 एप्रिल 2023 पासून कार्यान्वित होणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.