हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. कर्नाटकात यंदा काँग्रेसने जोरदार धोबीपछाड देत भाजपची सत्ता उलथवून टाकली आहे. सध्याचे कल पाहता कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे तर भाजप आणि JDS च्या जाग मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि कर्नाटकच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनाच काँग्रेस अध्यक्ष करणं पक्षाच्या पथ्यावर पडलं आहे.
कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागा आहे. त्यापैकी हाती आलेल्या कलानुसार, काँग्रेस १३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. JDS २१ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस एकहाती सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. अंतिम निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. आम्हांला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही असे कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, यापूर्वीचे जुने काही अनुभव पाहता घोडेबाजार होऊ नये म्हणून काँग्रेस सावध झाली आहे. निकालाचे कल हाती येत असतानाच काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूत बोलवलं आहे. तेथून आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 10 मे रोजी कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान झाले होते. त्यानंतर एक्सिट पोल मधेही काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सध्याचे कल पाहता एक्सिट पोल बरोबर ठरला आहे.