हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली.
आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतल्यानंतर करुणा शर्मा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येईल, असं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशारा करुणा यांनी स्पष्ट केलाय.
महापौरांची भेट घेऊन करुणा यांनी स्वच्छतागृह आणि कचऱ्याचा प्रश्न मांडल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लिकेशन्सवर फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ येत असतात, त्याविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
पूजा चव्हाण असो की इतर कोणतीही मुलगी, तिला न्याय मिळायलाच हवा. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मीही आत्महत्येचा विचार केला होता. पण मरण्यापेक्षा आपण लढणं पसंत केल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या. इथून पुढे आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.