कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. बेरोजगार तरुणांची हेळसांड करत असून कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकारी यांना १६ मार्चपर्यंत निर्णय घेण्यासाठी अल्टिमेट दिलेला होता, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आज बँक ऑफ महाराष्ट्रला टाळे ठोकण्यात आले आहेत. यापुढे बँकेचे शाखाधिकारी झोनल ऑफिसर यांनी भूमिका न बदलल्यास सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेऊन मी स्वतः बँकेच्या दारात आत्मदहन करणार असल्याचे सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी सांगितले.
दरम्यान, टाळे ठोका आंदोलनाचा भाग म्हणून येथील महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये कोंडणाऱ्या पाच ते सहा आंदोलनकर्त्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना आज बुधवार (दि.17) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. इम्रान लियाकत मुल्ला (रा. रुक्मिणी गार्डन, वाखान रोड कराड) तोफिक बागवान यांच्यासह इतर चार ते पाच अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुधवार पेठ,कराड चे मुख्य प्रबंधक ज्ञानेश्वर हरिश्चंद्र धडाडे (रा. वाखान रोड, मंगळवार पेठ कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याची नोंद पोलिसांत झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा