सातारा | जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर जगभरातून लाखो पर्यटक हे रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पाहण्यासाठी येत असतात. वर्षातील दोन- तीन महिने या हंगामात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र, आता पर्यटक बारमाही कास पठारावर पठार फिरायला यावेत व त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूने नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे. सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या संकल्पनेतून सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
कास पठार व परिसरातील पर्यटन हे हंगामी न राहता, ते बारमाही रहावे आणि पर्यटन वाढीस लागावे, या हेतूने मंगळवारपासून (दि. 19) नाईट जंगल सफारीचा हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर कास पठार व परिसरातील 50 किमी अंतरावर नाईट जंगल सफारी करण्याचे कास पठार कार्यकारी समिती व सातारा वनविभाग यांनी निश्चित केले आहे.
या नव्याने सुरू केलेल्या उपक्रमासाठी समितीकडून दोन सुसज्ज गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. याचा मार्ग कास पुष्प पठार – घाटाई फाटा – घाटाई देवी मंदिर – वांजुळवाडी – कास तलाव – कास मंदिराच्या पुढील बाजूने तांबी फाटा -पाली, तांबी – धावली – जुंगटी – कात्रेवाडी – परत तांबी फाटा – अंधारी – कोळघर – सह्याद्रीनगर – चिकनवाडी – मोळेश्वर – एकीव – पारंबे फाटा परत कास पुष्प पठार असा 50 किमीचा हा मार्ग आहे. यामध्ये एकूण 3 तासाची जंगल सफरी असणार आहे.