हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता या दोन्ही पोटनिवडणूका २६ फेब्रुवारीला होतील. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. पुणे, जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी पोटनिवडणूक होत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर 12वी इयत्ता HSC परीक्षा आणि पदवीधर पदवी परीक्षा घेतली जाणार असल्याचा अहवाल दिला होता. त्यांनतर निवडणूक आयोगाने संबंधित बाबींचा विचार करून निवडणूक तारखेत बदल केला आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीला दोन्ही मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २ मार्च रोजी मतमोजणी पार पडेल.
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार होते. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं आहे . त्यामुळे या दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना रंगण्याची शक्यता आहे.