केंदारनाथ ते लोधवडे : छ. संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी उत्तराखंड मधून येणार पेटती ज्योत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीला दूरदूरच्या किल्ल्यांवरून ज्योत आणण्याची परंपरा आहे. अनेक गावातील मुलं अनवाणी पायाने धावत या गड- किल्ल्यांवर ऊनवारा पाऊस झेलत ज्योत आणत असतात. मात्र, साताऱ्यातील एका दुष्काळी गावातील 31 तरुणांनी 13 मे रोजी येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी चक्क चार राज्य ओलांडून उत्तराखंड येथून ज्योत आणण्याचा निर्धार केला आहे. उत्तराखंड येथून ज्योत घेवून परतण्याचा प्रवास देखील सुरू झाला आहे.

उत्तराखंडातील बर्फाने अच्छादलेल्या डोंगर रांगामध्ये असलेल्या केदारनाथ मंदिरातून या ज्योत आणण्यास सुरुवात करण्यात आली. साताऱ्यातील माण या दुष्काळी तालुक्यातील लोधवडे या गावातील 31 तरुणांनी ही मोहीम करायचा निर्धार केला. त्यासाठी अनेक महिने धावण्याचा सराव केला होता. कारण थंड हवेचे ठिकाण असलेल्या केदारनाथ मंदिरातून ज्योत आणणे तेवढी सोपी बाब नसल्याने त्याची तयारी करून घेण्यात आली.

सध्या ज्योत घेवून येताना या तरुणांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्या भागात अचानक झालेला पाऊस, दरडी कोसळणे, थंड वातावरण आणि रखरखते ऊन या सगळ्या संकटांवर मात करत हे तरुण 700 किलोमिटरचा टप्पा पार करत ग्वाल्हेर या ठिकाणी पोहचले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 14 मे रोजी जयंती आहे. त्यामुळे 13 मे पर्यंत लोधवडे या गावात ज्योत घेवून येण्यासाठी रोज प्रत्येक तरुण दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटर धावत आहे.