बलात्कार करणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी भररस्त्यावरून काढली धिंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विविध प्रकारचे गुन्हे करून परिसरातील लोकांच्या मनात आपल्या नावाची दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला तुळींज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या गावगुंडांची लोकांच्या मनातून भीती कमी व्हावी, यासाठी पोलिसांनी त्याची भररस्त्यावरून धिंड काढली आहे. तुळींज पोलिसांनी संबंधित गावगुंडाच्या हातात हातकडी आणि साखळी बांधून त्याची तब्बल दोन तास पायी धिंड काढली आहे. नागरिकांसोबत गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यासाठी पोलिसांनी या गावगुंडांची धिंड काढल्याचे सांगितले आहे.

मोनू रायडर असे या आरोपी गावगुंडाचे नाव आहे. आरोपी मोनू याने बळजबरीने घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली होती. यानंतर आरोपी मोनूच्या काही साथीदारांनी पीडित महिलेच्या पतीला दुचाकीवर बसवून एका अज्ञातस्थळी नेले व त्याला काही तास डांबून ठेवले. यानंतर मोनू रायडर या आरोपीने पीडित महिलेला धमकावून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा केल्या.

यानंतर या आरोपीने या महिलेच्या घरातील रक्कम लुटून नेली. तसेच या आरोपीच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला आचोळे परिसरात दोन तास ओलीस ठेवले होते. या आरोपींनी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 च्या सुमारास संबंधित महिलेच्या पतीची सुटका केली होती. यानंतर पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार, अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या आरोपी मोनू रायडरवर विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ला असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. यानंतर पोलिसांनी लोकांच्या मनातून या आरोपीची भीती कमी व्हावी म्हणून त्याची प्रगतीनगर परिसरातून धिंड काढली.