नंदुरबार । “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पॉझिटिव्ह चर्चा झाली, ८ दिवसात राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार” असे एकनाथ खडसेंनी सांगितल्याचा दावा राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार आणि खडसे समर्थक उदेसिंग पाडवींनी केला. “मुंबईतून आनंदाची बातमी आणलीत का?” असा प्रश्न भाजप नेते एकनाथ खडसे यांना विचारला असता, त्यांनी शरद पवारांशी पॉझिटिव्ह चर्चा झाल्याचे सांगितले आणि नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार, असे खात्रीपूर्वक सांगितल्याचा उदेसिंग पाडवी यांनी सांगितलं आहे.
“मागच्या सोमवारी मी मुक्ताईनगरला गेलो होतो. त्यावेळी नुकतेच साहेब (एकनाथ खडसे) मुंबईहून परत आले होते. मुंबईला काय घडलं, याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती. देशाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसेंची चर्चा होणार होती, याची मला पूर्ण कल्पना होती. त्या उत्सुकतेपोटी मी जळगावला गेलो, माझ्यासोबत भाजपमध्ये असलेले माझे मित्र डॉ. स्वानंद आणि डॉ. आघाडे होते” अशी माहिती उदेसिंग पाडवी यांनी दिली. “एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी मी गेलो असताना, त्यांना म्हटलं होतं, की आपणही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वार्ता जिल्ह्यात आहेत. पण मी कुठला निर्णय घ्यावा, याविषयी मार्गदर्शन करा. आपल्याला तर कुठेही मंत्रिपद, आमदारकी मिळू शकेल, पण माझ्या जिल्ह्यात (नंदुरबार) राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, की तुला जायचंच असेल, तर राष्ट्रवादीसारखा दुसरा पक्ष नाही. तुझं पुनर्वसन तिथेच होईल” असा दावा उदेसिंग पाडवी यांनी केला.
“खडसेंच्या आदेशानेच मी 9 सप्टेंबरला मुंबईला गेलो. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने, जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला” असे पाडवींनी सांगितले. मी सोमवारी त्यांना भेटून “मुंबईतून आनंदाची बातमी आणली का?” असे विचारले. “पॉझिटिव्ह चर्चा झाली, उहापोह झाला. आठ दिवसात आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार” असे खडसेंनी सांगितल्याचा दावा पाडवींनी केला. “राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कोटा आहे. त्यापैकी 4 ते 5 राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील. त्यामध्ये एक जागा एकनाथ खडसे यांची निश्चित आहे. त्यांना मानाचे पद पक्षात आणि मंत्रिमंडळात मिळणार आहे. तसे झाल्यासल उत्तर महाराष्ट्र आणि जिल्ह्याला चांगले दिवस येतील” असा विश्वासही पाडवींनी व्यक्त केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”