Khalapur Landslide: बुधवारच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडी गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तब्बल ३० ते ४० घरे मातीच्या ढिगार्याखाली गेल्याची माहिती बचाव कार्य पथकाकडून देण्यात आली आहे. तर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी बचाव पथकाकडून नागरिकांनी मदत करण्याचे कार्य सुरु आहे. मुख्य म्हणजे, घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी जावून दुर्घटनेचा संपूर्ण आढावा घेतला आहे. बचावकार्य करण्यासाठी आमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत परंतु खराब हवामानामुळे ते उड्डान करु शकत नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी बचावकार्यातील मुख्य अडचण सांगितली आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू-
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे. हेलिकॉप्टर तयार आहेत पण हवामानामुळे ते उड्डान करु शकत नाही. मी त्यांच्या सतत संपर्कात आहे. युद्धपातळीवर बचावकार्य (Khalapur Landslide) सुरू आहे.”
आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू – (Khalapur Landslide)
त्याचबरोबर, “ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे NDRF तैनात करण्यात आलेलं आहे. इर्शाळवाडी गावात जवळपास ४०-४५ घरे आहेत. ही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. या दुर्घटनेत (Khalapur Landslide) आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. NDRF, SDRF आणि TDRF यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान बुधवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळण्याची ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या गावात तब्बल ४० घरे आहेत. यातील १५ ते १७ घरे मातीच्या ढिगाराखाली सापडली आहेत. आत्तापर्यंत यातील २५ जणांना बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर राज्यातील इतर नेत्यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. या घटनेबाबत बोलताना, “रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.