किरीट सोमय्यांना पुन्हा व्हायरल व्हिडिओची धमकी; 50 लाखांची मागितली खंडणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजप नेते किरीट सोमय्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. 50 लाख रुपये दिले नाही तर त्यांच्या संबंधित असणारे व्हिडिओ व्हायरल केले जातील, अशी धमकी सोमय्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश शुल्का अशा नावाच्या व्यक्तीने ई मेल पाठवून सोमय्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. त्यानंतर सोमय्यांनी मुलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

याप्रकरणी नवघर पोलिसांनी आपल्या बाजूने तपासाला सुरुवात केली आहे. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर, आपण या सर्व प्रकाराचा लवकरात लवकर छडा लावू असे आश्वासन पोलिसांनी सोमय्या यांना दिले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच, किरीट सोमय्यांचा एक आक्षेपार्ह्य व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे किरीट सोमय्या वादाच्या भौऱ्यात अडकले होते. यानंतर त्यांनी, या सर्व प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे म्हणत व्हायरल व्हिडिओची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

मुख्य म्हणजे, किरीट सोमय्या यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. तसेच पावसाळी अधिवेशनात देखील या व्हिडिओचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. तर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंनी त्यांच्याकडे या प्रकरणाचा आठ जीबीचा डेटा असल्याची खळबळजनक माहिती दिली होती. तसेच, किरीट सोमय्या यांचा हा व्हिडीओ लिक केल्याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीवर 72 तासांची बंदी घालण्यात आली होती. परंतु ही बंदी उच्च न्यायालयाने तत्काळ हटवली. त्यानंतर आता सोमय्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.