किसनवीर साखर कारखाना : गेल्या 22 महिन्याच्या पगारासाठी 400 कामगारांचा ठिय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना 22 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आज साेमवारी दि. 21 रोजी कारखान्याचे गेट समाेर ठिय्या आंदाेलन पुकारले आहे. या आंदाेलनात सुमारे 400 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत.

भुईंज येथील हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या 22 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारा बाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदाेलनात सुमारे 400 कामगार सहभागी झाले आहेत.

यावेळी कारखान्यातील ज्येष्ठ कामगार म्हणाले, माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष मदन भाेसले आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यांची आम्हांला माहिती आहे. परंतु आमची सहनशीलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमाेर आंदाेलन छेडावे लागले आहे.