मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताचा ओपनर शुभमन गिलला दुखापत झाल्यामुळे राहुलला इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी संधी मिळू शकते. भारताचा कर्णधार विराट कोहली याने केएल राहुल हा आपला आवडता खेळाडू असल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. पण केएल राहुलने मात्र एमएस धोनी हा आपला फेवरेट कर्णधार असल्याचे सांगितले. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपण धोनीसाठी छातीवर गोळी झेलायलाही तयार असल्याचे राहुलने सांगितले.
काय म्हणाला केएल राहुल
‘जर कोणी कर्णधार या शब्दाचा उच्चार केला, तरी आमच्या पिढीसाठी पहिलं नाव एमएस धोनीचं येतं. आम्ही सगळे त्याच्या नेतृत्वात खेळलो आहोत आणि अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण त्याचा सन्मान करतं. आपल्या करियरमधल्या उतार-चढावामध्येही धोनी कायम विनम्र राहिला,’ असे राहुल म्हणाला. तसेच ‘असंख्य क्रिकेटपटूंप्रमाणेच केएल राहुलचा आयडलही धोनीच आहे. लहान असताना मीदेखील धोनीलाच माझा प्रेरणास्त्रोत मानलं. रांचीसारख्या छोट्या शहरातला मुलगा टीम इंडियाचा कर्णधार बनला, हे पाहून मलाही आत्मविश्वास मिळाला, की आपणही एक दिवस भारतासाठी खेळू,’ असे वक्तव्य देखील केएल राहुलने केले आहे.
एम. एस. धोनी कर्णधार असताना राहुलने टेस्ट, वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले होते. केएल राहुल हा आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार आहे. केएल राहुल 2019 नंतर एकही टेस्ट टेस्ट मॅच खेळला नाही. त्याने 36 टेस्टमध्ये 34.58 च्या सरासरीने 2006 रन केले आहेत. यामध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.