औरंगाबाद – शहरातील अत्यंत गजबजलेल्या कॅनॉट परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॉक्टरवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना काल रात्री घडली. यामध्ये डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अब्दुल राफे (अंकोसर्जन) असे त्या जखमी डॉक्टरचे नाव आहे. चाकू हल्ल्याचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार डॉ. अब्दूल हे शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत असून कॅनॉट प्लेस परिसरातील एका अपाटमेंटमधील राहतात. दैनंदिन कर्तव्यावरुन डॉ. अब्दूल हे कॅनॉटमधील राहत्या घरी आल्यानंतर अवघ्या काही वेळातच अनोळखी व्यक्ती पल्सर दुचाकीवरुन त्यांच्या घरी आला. तसेच आपल्या पोटात दुखत असल्याचे सांगून त्याने एका चिठ्ठीवर गोळ्याऔषधींची नावे लिहून घेतली. मेडिकलमधून औषधी घेतल्यानंतर त्या कशा घ्यायच्या हे विचारण्यासाठी पुन्हा डॉक्टरांकडे गेला. डॉ. अब्दूल त्याला औषधी पुन्हा दाखविण्यासाठी डॉक्टरांना भेटायला आला़ डॉक्टरांनी त्याला गोळ्या कशा पद्धतीने घ्यायच्या हे सांगत असतानाच हल्लेखोराने त्याच्याजवळील धारदार चाकू काढून डॉ. अब्दूल यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान एकच गोंधळ झाल्याने हल्लेखोराने तिथून पळ काढला. पळताना नागरिकांनी हल्लेखोराला पकडले असता, डॉ. ने माझ्या बहिणीला मारले आहे, असे म्हणत नागरिकाच्या हाताला हिसका देऊन हल्लेखोर त्याची दुचाकी सोडून पळून गेला. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून ती कर्नाटकातील गुलबर्गा येथील असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकू हल्ल्याची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत डॉक्टरांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात सिडको पोलीस तपास करत होते.