बुधगाव मध्ये तलाठी कार्यालयास ग्रामस्थांनी ठोकले टाळे,नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी झाले संतप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । मिरज तालुक्यातील बुधगाव येथे अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तलाठी कार्यालयाला मंगळवारी टाळे ठोकले आहे. गत आठवड्यात जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्‍यात असणार्‍या द्राक्षबागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहेत रब्बीच्या पिकांनाही पावसाचा फटका बसला. पंचनामे यांचा आदेश देऊन तीन दिवस उलटून देखील तलाठी कार्यालयाकडून पंचनामे होत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी हे पाऊल उचलले आहे.

शेतीच्या नुकसानीबाबत शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी सांगली कृषी विभागाकडून जिल्ह्यातील संबंधित तलाठी कार्यालयांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मिरज तालुक्यातल्या बुधगाव येथील तलाठी कार्यालयाकडून अद्याप पंचनामे झाले नाहीत, तीन दिवस उलटुन देखील तलाठी कार्यालयाकडून कोणत्याही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले.

मिरज तालुक्यातल्या कवलापूर, बुधगाव, बिसुर, खोतवाडी, नाद्रे या गावात द्राक्ष, ऊस, गहू, हरभरा, शाळू तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र, तलाठी दुपारी 1 वाजून गेले तरी फिरकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेंल्या बुधगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी गावातील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकले. २०२० साली झालेल्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही, आता अधिकारीच फिरकले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी हे आंदोलन केले. जर तातडीने मदत मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यलयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Comment