सोलकढीचे ‘हे’ जबरदस्त फायदे माहित आहेत का? एकदा पहाच

solkadhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आणि खास करून कोकण पट्ट्यात मांसाहार असल्यास सोलकढी हमखास पिली जाते. सोलकढी हे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण असते. पोटभरून आणि मनसोक्त जेवल्यावर ढेकर आला कि आपल्याला एकदम तृप्त वाटत, तोच ढेकर आणण्याचे काम सोलकढी करते. आंबट गोड चव असणारी ही सोलकढी जेवण झाल्यानंतर आपलं मन व पोट दोन्ही शांत ठेवायला मदत करते.पण तुम्हाला माहित आहे का? सोलकढी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आज जाणून घेऊया सोलकढीमुळे शरीरावर कोणते चांगले परिणाम होतात…

सोलकढी म्हणजे कोकम आणि नारळाच्या दूधाचे मिश्रण… कोकमामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. तर ओल्या नारळात प्रथिने, व्हिटॅमिन-सी, खनिजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. कोकमातील घटक पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मांसाहारासारखे पचायला जड आणि झणझणीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकढी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.

सोलकढीमध्ये असलेल्या कोकम मुळे अपचनाचा त्रास कमी होतोच, याशिवाय शरीरावरील आणि मनातील ताण हलका होण्यास मदत होते. कोकम मेंदूच्या कार्याला चालना देण्यासही मदत करते.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठीही सोलकढी उपयुक्त आहे. याचे कारण म्हणजे कोकमातील खनिजांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. तसेच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठीही कोकम उपयुक्त आहे. त्यामुळे सोलकढी पिल्याने हृदय विकाराच्या संबंधित तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात.

त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील सोलकढीचे सेवन फायदेशीर ठरते. नारळ आणि कोकमातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट एकत्र आल्याने त्वचा सतेज होते. तसेच चेहर्‍यावर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होते.

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे जेवणानंतर सोलकढीचा आस्वाद घेणं अधिक फायदेशीर आहे.