कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत पाचवा बालचित्रपट महोत्सव मंगळवार, दि. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जगभरातील सहा उत्तमोत्तम चित्रपट दाखविण्यात येणार असून याचा लाभ प्रामुख्याने महानगरपालिकेच्या ६० शाळांमधील विद्यार्थी घेणार आहेत.
चिल्लर पार्टीतर्फे महिन्याच्या चौथ्या रविवारी मुलांसाठी जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखविले जातात. समाजातील जागरूक पालकांची मुले या उपक्रमाला उपस्थित असतात; परंतु ज्यांना रोजच्या रोजीरोटीची चिंता आहे, अशा वंचित कुटुंबातील मुलांपर्यंत बाल चित्रपट पोहोचविण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे गेली चार वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि अभिनेता आनंद काळे यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे सभापती श्रावण फडतारे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचा समारोप १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस.के. यादव उपस्थित राहणार आहेत.
हे आहेत सिनेमे
या महोत्सवात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता बेब, १२ वाजता फ्री विली, २.३० वाजता पीट्स ड्रॅगन तर १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता वॉटर हॉर्स, दुपारी १२ वाजता डम्बो आणि दुपारी २ वाजता डॉग्ज वे होम हा समारोपचा सिनेमा दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही सिनेमे प्राणीजगताशी संबंधित आहेत.
शिनेमा पोरांचा पुस्तकाचे प्रकाशन
या बालचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील १0 बालचित्रपटांचे कथानक असलेल्या ‘शिनेमा पोरांचा’ या पुस्तकाच्या दुसरा भागाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक महोत्सवात सहभागी होणाऱ्या शाळांना चिल्लर पार्टीतर्फे भेट देण्यात येणार आहे.
कागदी विमान उडवणाऱ्या मुलीचा विशेष लोगो
मोठी स्वप्ने पहायला शिकविणारे आणि स्वच्छंदपणे आपल्या अवकाशात मुक्तपणाने उडायला शिकविणारे प्रतीक म्हणून कागदी विमान उडवणाऱ्या मुलीचा विशेष लोगो या बालचित्रपट महोत्सवासाठी तयार करण्यात आला आहे. कागदी विमान भिरकावून उंच भरारी घेणाऱ्या मुलीची मानसिकता दर्शविणारा हा यंदाचा विशेष लोगो चिल्लर पार्टीतर्फे साकारण्यात आला आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेले सायकल फिरविणारी, पतंग उडविणारी, टायर फिरविणारी आणि भिरभिरं उडविणाऱ्या मुलीचा विशेष लोगो विद्यार्र्थ्याचे आकर्षण केंद्र ठरले होते.
कागदी विमानांचे भरणार प्रदर्शन
चिल्लर पार्टीतर्फे तयार करण्यात आलेल्या या महोत्सवाचा लोगो म्हणजे कागदाचे विमान महानगरपालिकेतील विविध शाळांमधील विद्यार्थी स्वत: तयार करणार आहेत. मुलांच्या कलागुणांना यामधून वाव मिळेल, यासाठी या कलाकृती महत्वाच्या ठरणार आहेत. महोत्सवाच्या कालावधीत शाहू स्मारक भवनाच्या प्रांगणात या कागदांच्या विमानाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, तसेच भव्य विमानाची एक प्रतिकृतीही दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.