कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर चित्रनगरीचा दर्जा उन्नत करून चित्रीकरणासाठी अधिकाधीक प्रतिसाद मिळावा याकरिता पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. विधानभवनामध्ये झालेल्या राज्यमंत्री पाटील यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या बैठकीत त्यांनी ह्या सूचना केल्या.
यावेळी राज्यमंत्री पाटील म्हणाले, ”मराठी चित्रपटसृष्टीसाठी कोल्हापूरची चित्रनगरी महत्वपूर्ण ठरत आहे. याठिकाणी अनेक नामवंत दिग्दर्शक, कलाकारांनी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे याठिकाणी अधिकाधीक चित्रपटांचे, मालिकांचे चित्रिकरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण कराव्यात.”
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये रेल्वेस्थानक उभारणी प्रस्तावित असून त्याचे काम झाल्यास हिंदी चित्रपट निर्मात्यांकडूनही चित्रनगरीसाठी योग्य तो प्रतिसाद मिळू शकतो, असेही राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्थानकासोबतच याठिकाणी विमानाची प्रतीकृती देखील ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या माध्यमातून ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ (एनएसडी)च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा’ (एमएसडी) हा दोन वर्षांचा नाट्य अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित असून पदवी आणि पदव्युत्तर असा हा अभ्यासक्रम असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या विविध शाखांचे सादरीकरण करण्यात आले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.