कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱया टोळीने वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कर्मचाऱयांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. मध्यरात्री पेरीड गावच्या वनहद्दीत ही घटना घडली. वनरक्षक राजाराम बापू राजीगरे हे जखमी झाले आहेत. मलकापूर वनपरिक्षेत्राचे नंदकुमार नलवडे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाचे कर्मचारी वनपाल संजय कांबळे, वनरक्षक राजाराम राजीगरे, दिनकर पाटील, सर्जेराव पोवार, वनसेवक रामचंद्र केसरे यांच्यासह वनविभागाचे गस्ती पथक पेरीड-शिरगाव वनविभागाच्या हद्दीत गस्त घालीत होते. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पेरीड गावच्या जंगलात कमांडर गाडी संशयास्पद उभी असल्याचे आढळून आले. चारजण मौल्यवान खैर जातीची लाकडे गाडीत भरत असल्याचे वनकर्मचाऱयांच्या निदर्शनास आले. त्यांना रोखले असता संशयित वसंत पाटील व भगवान सावंत या दोघांनी वन कर्मचाऱ्यावर चॉपर उगारून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्यासाठी आलेल्या वनकर्मचारी राजाराम राजिगरे यांना उंचावरून ढकलून दिले.
संशयित चौघेजण कमांडर गाडीत बसून भरघाव वेगाने निघाले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून हे सर्वजण पसार झाले. परिसरामध्ये शोध घेतला असता एक दुचाकी मिळून आली. तसच पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमालासह घराच्या परिसरात खैर झाडाची लाकडी १५ पोती, वृक्षतोडी साठी लागणाऱ्या सर्व प्रकारचे साहित्य, तसेच लाकूड कटर मशीन व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. मलकापूर परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार नलवडे अधिक तपास करीत असून याबाबत शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सदरच्या घटनेने संपूर्ण शाहुवाडी तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.