हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या म्हणजेच 16जुन रोजी या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापूर मधील मराठा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत संभाजी राजे यांच्या समोरच आंदोलकांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरमध्ये आंदोलनाची हाक दिली. पण आंदोलनाच्या आदल्या दिवशी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे संभाजी राजे यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दिनांक 16 जून रोजी घेण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी ही बैठक कोल्हापुरातील नर्सरी बागेत बोलावली होती. या बैठकीत एकच गोंधळ उडाला. संभाजीराजे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. संभाजीराजे यांनी उभे राहून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं मात्र बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. हा गोंधळ नेमका कशामुळे झाला याची माहिती मात्र अद्याप समजू शकलेली नाही.
उदयनराजेंचा आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान संभाजी राजे यांनी सोमवारी पुन्हा उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीवर उदयनराजे यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे आणि जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर उद्रेक होईल. असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे. संभाजी राजे यांच्या विचारांशी आपण सहमत असल्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटलं. संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे पण आमचा मार्ग एकच आहे. असे उदयनराजे यांनी सांगितले आहे.