कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविला. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधला. ‘राज्यामध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या सरकारची स्थापना झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आकाराला येईल. शिवसेनेचे दहा सदस्य दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत येतील,’ असेही आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक झाली. सदस्यांना भेटण्याअगोदर मुश्रीफ व पाटील यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सदस्यांशी संवाद साधला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसची सत्ता येण्यासाठी आवश्यक जुळणी नेत्यांनी केली आहे. बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आघाडीची शंभर टक्के सत्ता येणार हे निश्चित आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सदस्याने खबरदारी बाळगावी. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांच्या संपर्कात जास्त राहू नये. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत मैत्री झाली असली तरी निवडणुकीच्या कालावधीत लांब राहणे योग्य आहे. कोणाला शंका घ्यायला वाव देऊ नका.’
बैठक संपल्यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषदेत सत्ता आणण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. ‘राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण झाल्यामुळे शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीत सोबत येऊ शकते. दहा सदस्य काँग्रेस आघाडीसोबत येतील. अजून त्यांच्याशी चर्चा करायची आहे. इतर घटकांशी बोलणी व्हायची आहेत. पण जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्याचे ठरल्याचे पी. एन. पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.