कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या काही दिवसापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मूसळधार सुरूवात केली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या धरणात 17 हजार 52 क्यूसेक आवक सूरू आहे. धरणात गेल्या चोवीस तासात 2. 21 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे. सातारा, पुणे, रत्नागिरी व सिंधुदुर्गला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.
वाई, जावली, महाबळेश्वर, पाटण, सातारा तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. कराड, खंडाळा तालुक्यालाही पावसाने चांगलीच ये- जा सुरू आहे. तर माण- खटाव, कोरेगाव व फलटण येथेही पावसाची उघडझाप सूरू आहे. रात्रीत कोयना नवजा परिसरात 207 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 92 मि. मी तर नवजा येथे 115 मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला 130 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे..
सध्या कोयना धरणात 68. 90 टीएमसी पाणीसाठा असून धरण 65. 46% टक्के भरले आहे. धरणातील आवक ही वाढली झाली असून सध्या 17 हजार 52 क्युसेक आवक सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरण व्यवस्थापन पाणी सोडण्याचा निर्णय घेवू शकते. तेव्हा नदीकाठी जाणे लोकांनी टाळणे गरजेचे आहे.