कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणात 55.07 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून 33 हजार 912 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाला संबोधले जाते. या धरणातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती व पुरवठाही केला जातो. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथील पर्जन्यमापकावर 79 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना परिसरात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चोवीस तासात मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार कोयना धरणाच्या पाणी पातळी 2113 फूट तर पाणीसाठा 55.07 टीएमसी हाला आहे. धरणातील पाण्याची आवक 33 हजार 912 क्युसेसने सुरु आहे. चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात कोयना येथे 52 मिमी, (एकूण 1453), नवजा 79 मिमी (एकूण 2055) तर महाबळेश्वर 46 मिमी (एकूण 1989) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.