कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासात 9 टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. रात्रभर पावसाने धुवाधार हजेरी लावलेली असून कोयना विभागातील अनेक पूल पाण्याखाली गेलेले असल्याने वाहतूक बंद झालेल्या आहेत. गुरूवारी सकाळी 8 वाजता धरणात 66. 75 टीएमसी पाणीसाठा होता.
कराड – चिपळूण मार्गावरील कोयना विभागातील कदमवाडी ते नेचल दरम्यान काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. दत्तधाम जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्याने वाहतूकही मंदावली आहे. महाबळेश्वर, पाटण, जावली, कराड, सातारा, वाई जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून माण, खटाव, फलटण, खंडाळा या तालुक्यातही पावसाचा जोर असल्याचा दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरण व्यवस्थापन आज गुरूवारी दि. 22 सकाळी 11 वाजता पायथा वीजगृहातून 2100 क्युसेस पाणी सोडणार आहे. गेल्या 24 तासात पावसाचा जोर असल्याने नदीपात्र दुथडी भरून वाहत असताना धरणातूनही पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.