कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना पाणलोट क्षेत्रातसह सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. आज शनिवारी दि.16 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 52.15 टीएमसी म्हणजे 50 टक्के (निम्मे धरण) भरले असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या 12 दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत आहे. गेल्या 12 दिवसात 37 टीएमसी पाणीसाठा धरण क्षेत्रात वाढला आहे. तर सध्या 2100 क्युसेस पाण्याचा विसर्ग पायथा गृहातून सुरू आहे. धरणात सध्या 61 हजार 108 क्युसेस पाणी प्रतिसेंकद साचत आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 5.10 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना 153 मिमी, नवजा 162 मिमी आणि महाबळेश्वर 178 मिमी पडला आहे.
सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण आणि कराड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कराड तालुक्यात शेतीला उपयुक्त असा पाऊस पडत आहे. मात्र, माण, खटाव, फलटण येथे पावसाने पुन्हा दांडी मारल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातून उरमोडी, वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कांदाटी खोऱ्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीकाठी तसेच निरा नदीच्या काठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला.