कृष्णा बँक सुवर्णमहोत्सव सांगता : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर 2020 मध्ये 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा रविवार दि. 5 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सर्वसामान्य माणसांचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने 19 नोव्हेंबर 1971 रोजी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. बँकेने गेल्यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, या गेल्या 50 वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी कार्यकाळात कृष्णा सहकारी बँक ही केवळ कराड, वाळवा तालुक्याचीच नव्हे, तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याच्या समृद्धीची अर्थवाहिनी बनली आहे. बँकेने साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात शाखा सुरू केल्या असून, आता संपूर्ण राज्यात विस्तार करण्याचा निर्धार बँक व्यवस्थापनाने केला आहे.

दरम्यान, आज कृष्णा बँकेसह सहकारमहर्षी माननीय जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था आणि कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था यांचा एकत्रित असा कृष्णा आर्थिक परिवार निर्माण झाला आहे. या कृष्णा आर्थिक परिवाराच्या नव्या अद्ययावत कार्पोरेट कार्यालयाची उभारणी कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणात करण्यात आली आहे. या नव्या इमारतीत कृष्णा बँकेचा विस्तारित कक्ष, तसेच एटीएम सेंटरचीही उभारणी करण्यात आली आहे.

या कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.