कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड:- कोरोना काळात संपूर्ण जगावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली होती. आर्थिक संकट आले होते. पण या संकटाच्या काळातही कृष्णा बँकेने जनतेला मोठा आर्थिक दिलासा दिला. कोरोना काळातही बँकेने चांगली प्रगती केली असून, येत्या काळात कृष्णा बँक ही शेड्युल्ड बँक म्हणून आपली सेवा देणार असून, त्यादृष्टीने बँकेची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले. बँकेच्या ४९ व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे मार्गदर्शक य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षी कोविड-१९ च्या संक्रमणात वाढ झाल्यामुळे शासन निर्देशानुसार कृष्णा बँकेची सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सभेपुढील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. कापसे यांनी सभेच्या नोटीसीचे वाचन केले.
यावेळी बोलताना चेअरमन डॉ. भोसले पुढे म्हणाले, की कृष्णा हॉस्पिटलप्रमाणेच कृष्णा बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही कोरोनात लोकांना चांगली सेवा दिली. इतर व्यवसाय अडचणीत आले असताना बँकेने केलेली वाटचाल वाखाणण्याजोगी आहे. कृष्णा बँकेवर सभासदांचा ठाम विश्वास आहे. गेल्या १० वर्षात नेट एन.पी.ए. शून्य असणाऱ्या देशातल्या मोजक्या बँकांपैकी कृष्णा बँक एक आहे. पारदर्शक कामकाजामुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी आहे. स्व. आप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा ही संस्था जोपासत असून, कृष्णा बँकेचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रात करण्याचा आमचा मनोदय आहे. येणाऱ्या ३ वर्षात कृष्णा आर्थिक परिवार २००० कोटींचा टप्पा गाठेल.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आपल्या ग्रामीण भागातील लोकांना बँकेचा उपयोग व्हावा हा आप्पासाहेबांचा विचार होता. शेतकऱ्यांची आपली बँक म्हणून कृष्णा बँकेची ओळख आहे. कृष्णा बँक अनेक निकषांमध्ये पात्र ठरली आहे. म्हणूनच सहकारी बँकेमध्ये कृष्णा बँक अग्रेसर ठरली आहे. बँकेच्या सर्वाधिक शाखा ह्या ग्रामीण भागात आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. रिजर्व्ह बँकेनेही कृष्णा बँकेला नावाजलेले आहे.
यावेळी उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, महादेव पवार, प्रमोद पाटील, ॲड. विजयकुमार पाटील, बाळासो पवार, नामदेव कदम, व्यवस्थापक गणपती वाटेगावकर, भगवान जाधव आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा