कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून प्रचाराची सांगता सभा घेऊन जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल व संस्थापक पॅनेलवर कारवाई करण्यात आली. याबाबत तलाठी यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दोन्ही पॅनेलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना जिल्हाधिकार्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता आदेश पारीत केला होता. त्या आदेशाचा भंग करून रेठरे बुद्रुक येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने प्रचारार्थ सांगता सभेचे आयोजन केले होते. त्या सभेमध्ये सुमारे 800 ते 900 लोक जमा होते. जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता मिळून आल्याने सभेचे आयोजन करणारे संजय भगवान पवार व इंद्रजित हणुमंत कदम (दोघेही रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार तलाठी विशाल प्रताप पाटील यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे.
तर वाठार ता. कराड येथे संस्थापक पॅनेलने रविवारी सायंकाळी 6.30 वाजता प्रचारार्थ सांगता सभेचे आयोजन केले हेाते. त्या सभेमध्ये 700 ते 800 लोक जमा होते. जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टसिंगचे पालन न करता मिळून आल्याने सभेचे आयोजन करणारे सुरेश उर्फ सुभाष बाबुराव पाटील, सतीश वसंत यादव व श्रीकांत राजाराम देवकर (सर्व रा. वाठार, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार तलाठी दादासाहेब भिमराव कणसे यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे.