कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. दरम्यान जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भोसले यांनी आम्ही घेतलेल्या प्रचार सभांना मतदारांनी दिलेला चांगला प्रतिसाद पाहता जयवंतराव भोसले सहकार पॅनेल चांगल्या मताधिक्क्याने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी मतदानास सुरवात झाली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या पत्नी उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले व त्यांच्या पत्नी गौरवी भोसले, विनायक भोसले यांनी रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी आपल्या कुटुंबीयांसह रेठरे बुद्रुक मराठी शाळेतील केंद्रावर जाऊन मतदान केले.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 148 मतदान केंद्रावरून मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या माध्यमातून तालुक्यात प्रचार सभा घेत कारखाना सत्तेत असताना कालावधी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचा व सभासदांच्या हितासाठी केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवली. मतदारांनाही जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या सभांना व प्रचाराला चांगला प्रतिसाद दिला आहे.