कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तिरंगी लढतीत कोणाला पाठिंबा द्यायचा यांचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय घेण्याअगोदर बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील बंगल्यावर खलबते झाली, अन् अखेर काॅंग्रेसच्या उंडाळकर गटाने राष्ट्रवादीच्या अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला साथ देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहिते गटात समेट करण्याच्या बैठका, चर्चा चालू होत्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील, राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम यासह नेते मंडळींनी प्रयत्न केले होते. आघाडीच्या चर्चा थांबल्यानंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी कॉग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील व कॉग्रेस पक्षाच्या काही पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत कोयना दूध संघावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बहुतांशी कार्यकर्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.
ऍड. उदयसिंह पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कृष्णा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठींबा जाहीर करून तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
गेली अनेक दिवस कृष्णेच्या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला राहणार याची उत्सुकता लागली होती. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थकासह अनेक कॉग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कृष्णेच्या रणांगणात सर्वांच्याच नजरा कॉग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या पाठींब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.
दरम्यान, आज हा निर्णय जाहीर करण्या अगोदर बुधवारी दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यावर ऍड. उदयसिंह पाटील, धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण यांच्यात बंद खोलीत तासभर चर्चा झाली. यावेळी बंगल्यावर मलकापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक इंद्रजित गुजर हेही उपस्थित होते.