कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी ८६ कोटी २१ लाख रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कर रूपाने गोळा होत असते. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आर्थिक वर्षात सर्वच संस्थांना मोठ्या आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागली. मात्र अशा परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत, सहकार व उद्योग क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे व्हॅट करापोटी ७७ कोटी १६ लाख रूपये आणि जीएसटी पोटी ९ कोटी ५ लाख असा एकूण ८६ कोटी २१ लाख रूपयांचा भरणा केला आहे. जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरला असून, याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा