कृष्णा हॉस्पिटल : गुरुवारपासून लसीकरणास प्रारंभ ; कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस मिळणार

Krishna Hospital Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वांत महत्वाचा भाग असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी कृष्णा हॉस्पिटल पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीचे 6 हजार डोस ; तर कोव्हॅक्सिनचे 2 हजार 880 डोस उपलब्ध झाले आहेत. गुरुवार दि. 22 जुलैपासून कृष्णा हॉस्पिटलमध्ये वय वर्षे 18 पूर्ण झालेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना सकाळी 9.30 ते 5 या वेळेत माफक दरात ही लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती, कृष्णा चॅरिटेबरल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटल सुरवातीपासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनावरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्मितीबरोबरच कोरोना चाचणी व लसीकरणात कृष्णा हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून 6 हजारांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच पहिल्या टप्पातील लसीकरण मोहिमेअंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये जवळपास 9 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

येथे कोविशिल्डच्या एका डोसची किंमत 780 रुपये असून, कोव्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत 1 हजार 200 रुपये इतकी आहे. लसीकरणासाठी येताना नागरिकांनी सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड व आधारला लिंक असणारा मोबाईल आणावा. ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुरू आहेत अशा रुग्णांनी, तसेच इमनोकोंप्रमाईज रुग्ण, तसेच मधुमेही अथवा उच्चरक्तदाब असणाऱ्या रूग्णांनी आपल्या डॉक्टरला तब्येत दाखवून, त्यांच्याकडून लस घेण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे. कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याने, नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.