गडचिरोली प्रतिनिधी | वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुका लढवल्याचं आपण आजपर्यंत पाहीलं आहे. पण ग्रामसभांनी स्वत:च आपला जनतेचा एखादा उमेदवार निवडणुकीला उभा केल्याचं आपण कधी ऐकलेलं नाही. गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभा आगामी विधानसभा लढवणार आहे. देशात हा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अहेरी विधानसभा मतदार संघातून अॅड. लालसू नोगोटी कोणत्याही राजकीय पक्षांकडून न लढता जनतेचा उमेदवार म्हणुन ग्रामसभेकडून विधानसभा लढवणार आहेत.
लालसु नोगोटी हे भामरागड येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणुन निवडुन आले आहेत. भामरागडमध्ये ग्रामसभांनी मागील पंचायत समिती व जि.प. निवडणुका लढवल्या होत्या. ग्रामसभांनी निवडणुका लढवण्याचा यशस्वी प्रयोग लालसू यांनी केला आहे.
लालसू यांच्या विधानसभा निवडणुक लढवण्याच्या निर्णयामुळे अहेरी मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार अंबरीशराव अत्राम यांच्यासमोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे. लालसू यांना देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून ग्रामसभांच्या निवडणुक लढण्याच्या निर्णयाने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलू शकतात असे बोलले जात आहे.
एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढवल्यास निवडुण आलेला उमेदवार जनतेच्या भुमिका न मांडता सदर पक्षाच्या राजकिय भुमिकाच मांडतो. तेव्हा गडचिरोली जिल्ह्यात पेसा आणि वनाधिकार कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या सहाय्याने ग्रामसभांनी निवडणुक लढवणे लोकशाहीला बळकटी देणारे आहे. असे मत लालसु यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितले. तसेच आपण वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट करत वंचित अहेरी मतदार संघात ग्रामसभेला पाठींबा देईल असंही ते म्हणालेत. आगामी विधानसभा कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढवता अपक्ष म्हणुन आणि ग्रामसभेचा उमेदवार म्हणुन लढवणार आहे असेही लालसू यांनी सांगितले.
कोण आहेत लालसू नोगोटी?
लालसू नोगोटी हे माडिया आदिवासी समाजातील पहिले वकील आहेत. पुण्याच्या आयएलएस लाॅ काॅलेज मधून विधीचे शिक्षण पुर्ण केले आहे. नोगोटी हे सध्या गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. भामरागड तालुक्यात ग्रामसभेने निवडणुका लढवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. भामरागड आणि परिसरात ते मानव अधिकार आणि पेसा, वनहक्क कायदा यावर काम करतात.