हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lampan Marathi Web Series) आजकाल नाटक, सिनेमाइतकीच सीरिजला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. घरबसल्या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. वेगवेगळे आशय आणि विषय असणाऱ्या या सिरीज प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करतात. त्यामुळे निर्मात्यांचा देखील विविध भाषेतील कंटेंट दाखवण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत ओटीटीवर अनेक सिनेमे, नाटक, सिरीज आल्या आहेत. यातच आता प्रकाश नारायण संत यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित एक सीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. जिचं नाव ‘लंपन’ असं आहे.
‘लंपन’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला (Lampan Marathi Web Series)
‘लंपन’ नावाची ही मराठी सीरिज प्रकाश नारायण संत यांच्या प्रसिद्ध कादंबरी ‘वनवास’वर आधारित आहे. या सीरिजमध्ये मराठी साहित्याची अद्भुत जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये मिहिर गोडबोले या बालकलाकाराने ‘लंपन’ ची भूमिका साकारली आहे. ही पूर्ण सीरीज लंपनच्या आत्म- शोधाच्या प्रयत्नांवर विसावलेली आहे. त्यामुळे ही सिरीज कधी हसेल आणि हसवेल तर कधी टचकन डोळ्यात पाणी आणेल अशी आहे. माहितीनुसार, येत्या १६ मे २०२४ रोजी ही सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.
‘हे’ कलाकार झळकणार
‘लंपन’ या सिरीजमध्ये लंपनच्या भूमिकेत मिहीर गोडबोले तर लंपनच्या ‘आजी’ची भूमिका गीतांजली कुलकर्णी आणि आजोबांची भूमिका चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. (Lampan Marathi Web Series) तसेच यात लंपनची जिवलग मैत्रीण सुमीच्या भूमिकेत अवनी भावे आणि त्याच्या वडिलांच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर व आईच्या भूमिकेत कादंबरी कदम दिसणार आहेत. या सिरीजमध्ये गावाकडचे वातावरण, लहान मुलांचे खेळ, आजी आजोबांचे प्रेम अशा भावभावनांचे मिश्रण अनुभवायला मिळेल.
या सिरीजमध्ये एकेकाळी मालिकाविश्व गाजवणारी आणि बाळंतपणानंतर सिनेसृष्टीतून ब्रेक घेणारी ‘अवघाची संसार’ फेम अभिनेत्री कादंबरी कदम दिसणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करतेय. (Lampan Marathi Web Series) निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सीरिजचे निर्माते श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन आहेत.ट्रेलर रिलीजनंतर सिरीजबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे.