दहिवडीत घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहिवडीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पाठीमागे एसटी कॉलनी येथे अमजद अल्लाउद्दीन शेख यांचे राहते घरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पोलिसांच्या रात्रगस्ती सुरू असतानाही चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अमजद अल्लाउद्दीन शेख हे चारचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. पुतणीचे लग्न जमण्यासाठी ते कुळकजाई (ता. माण) या ठिकाणी गेले होते. मात्र कुळकजाईमध्ये पाहुण्यांचे येथे ते दोन दिवस मुक्कामी राहिले. घर बंद असल्याचे चोरट्याने पाळत ठेवून दि. 27 रोजी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील सोन्याचे पदक, अंगठी, मंगळसूत्र व इतर सोन्याच्या छोट्या- छोट्या वस्तू आणि रोख रक्कम 65 हजार रुपये अज्ञातांनी चोरून नेल्याचे घर मालक अमजद अल्लाउद्दीन शेख यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

अमजद शेख हे दोन दिवस कुळकजाई येथे राहण्यास गेल्यामुळे सदर चोरीचा प्रकार त्यांचे वडील यांनी अमजदला फोनवरून सांगितले की तुझ्या घराचे कुलूप कोणीतरी तोडले आहे. आणि कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले आहे. तेव्हा अमजद शेख यांनी दहीवडीमध्ये आपल्या घरी येऊन पाहिल्यानंतर समजले, की अज्ञात चोरट्यांनी बंद कुलूप तोडून चोरी केल्याचे समजले. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी तातडीने येऊन सदर घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पंचनामा केला. सदर प्रकरणाचा तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस करत आहेत.