कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
गेल्या दोन दिवसांपासून कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे या तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावात जमिनी खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असाच प्रकार गुरुवारी पाटण तालुक्यातही तारळे विभागातील म्हारवंड येथे घडला. बुधवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातही तारळे येथील म्हारवंड गावात भूस्खलन झाले. अचानकपणे झालेल्या भूस्खलनामुळे कड्याच्या मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला आहे. तर माती व पाणी लोकांच्या घरात घुसले.
पाटण तालुक्यातील म्हारवंड हे गाव तारळेपासून तब्बल वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. अतिशय दुर्गम अशा असलेल्या या गावात पावसाळ्यामध्ये भुस्तखलनाच्या घटना घडत असतात. गेली अनेक वर्षे या गावातील ग्रामस्थ जीव मुठीत धरून गावामध्ये राहत आहेत. मुसळधारपणे पडणाऱ्या पावसामुळे सध्या या गावातील लोकांवर भूस्खलनाची टांगती तलवार आहे. कोणत्याही क्षणी भुस्तखलन होईल व आपल्या घरावर मातीचे ढिगारे कोसळतील आणि त्यात आपला जीव जाईल, असे समजत येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून येणार प्रत्येक दिवस पुढे ढकलत आहेत.
येथील ग्रामस्थांना निवार्याची सोया नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या पाठीमागे लागून निवारा शेड बांधून घेतली. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या निवारा शेडमध्ये वीज, पाणी आदी सुविधा नाहीत. शिवाय तारळे सारख्या भागात जायचे तर या ठिकाणी पक्का रस्ताही नाही. जो रस्ता आहे त्यावर मातीचे ढिगारे अधून मधून कोसळत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद होत आहे. काळ झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावातील रस्त्यावर मातीचे ढिगारे कोसळल्याने दळणवळण ठप्प झाले असून गाव संपर्कहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अजून किती दिवस भूस्खलनाच्या या मृत्यूच्या दाढेत राहून जगायचं?, असा सवाल ग्रामस्थांतून प्रशासनास विचारला जात आहे.