सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मापरवाडी (ता. सातारा) येथील पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असून पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्याइतपत यांच्याकडे वेळ नाही, याकडे वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात यावी, अशी मागणी मापरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
सदर पाण्याच्या टाकीमधून गेल्या दोन दिवसांपासून पाण्यातून अळ्या आढळून येत आहेत. सदर टाकीतीत पाणी पिण्याबरोबरच इतर वापरासाठीही वापरतात. ग्रामपंचायतीकडून या पाण्याच्या टाकीची वेळेवर स्वच्छता करण्यात येत नसल्याने, त्यामध्ये अळ्या झालेचे नागरिकांनी सांगितले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही याकडे कानाडोळा करत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही बाब गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.
मापरवाडी ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे माजी पंचायत समिती उपसभापती अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार शिवेंद्रराजे गटाची एकहाती सत्ता आहे. मात्र, असे असताना देखील केवळ एकहाती सत्तेचा फायदा उठवत ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरु आहे. भौतिक सुविंधाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याकडे बघण्यास या पदाधिकाऱ्यांना वेळ नाही. पाण्याची टाकी साफ न केल्याने लोकांना अळ्या असलेले पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मापरवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यास बाधा झालेस त्यास ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढलीय : बाजीराव बाबर
गावचा विकास करण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मापरवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर सत्तेची धुंदी चढली आहे. ग्रामपंचायतीने आपली एकाधिकारशाही थांबवत नागरिकांना चांगले पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत गावच्या विकासाच्या दृष्टीने पाऊले उचलावीत, अन्यथा ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत लढा उभारू, असा इशारा शेंद्रे गटाचे नेते व मापरवाडी ग्रामस्थ बाजीराव बाबर यांनी दिला.