प्रतिनिधी, योगेश जगताप : महाविकासआघाडी सरकारपुढे साईबाबा हा विषय मागील १० दिवसांपासून गिरट्या घालत असल्याचं पहायला मिळत आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर परभणीतील पाथरी ग्रामस्थ आणि शिर्डीच्या साई मंदिर प्रतिष्ठान यांच्यामध्ये भांडणं लागली.
साईबाबांच्या जन्मस्थळाचे पुरावे पाथरीकरांनी गोळा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत पाथरीचा विकास हा जन्मस्थान म्हणून नाही तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्यात येईल अशी सुरक्षित मध्यस्थी या प्रकरणात केली.
मात्र यानंतर आर्थिक हेतुसाठीच देवस्थान मंडळं एकमेकांशी भांडणं करतायत असा संदेश महाराष्ट्रातील जनतेपर्यंत गेला आहे. साईबाबा आमचेसुद्धा आहेत असं म्हणत साईबाबा आमच्या परिसरातसुद्धा वास्तव्याला होते, आम्हालाही कोट्यवधींचा निधी द्या अशा मागण्या सोशल मीडियावर जोर धरु लागल्या आहेत. कोल्हापूर, डोंबिवली, सातारा अशा ठिकाणांहून ही मागणी येऊ लागल्याने आता सरकार नक्की कुणाकुणाला मदत करणार हा प्रश्न उभा राहिला आहे.