लातूर प्रतिनिधी । राज्यातील लक्षवेधी मतदारसंघापैकी एक म्हणून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे. या मतदारसंघातून दिवंगत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मूळ भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ अचानक शिवसेनेकडे आला आहे. शिवसेनेने नवख्या सचिन देशमुख यांना पक्षप्रवेश आणि निवडणुकीचे तिकीटही दिलं. शिवसेनेने मागणी न करताही हा मतदारसंघ अचानक शिवसेनेला सोडण्यात आला.
औसा हा शिवसेनेचा मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे ही आदला-बदल झाली होती. आता शिवसेना या ठिकाणी नसल्यासारखीच झाली आहे. निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.
शिवसेनेचा उमेदवार दाखवा हजार रुपये मिळावा अशी चर्चा लातूर ग्रामीण मधील नागरिक करीत आहेत. लातूर ग्रामीणमध्ये देशमुख विरुद्ध देशमुख चुरशीची लढत होईल असे वाटत होते. मात्र शिवसेनेच्या सचिन देशमुख यांच्या भूमिकेमुळे स्वतः शिवसैनिकच संभ्रमात पडले आहेत. आता सचिन देशमुख हे काँग्रेसच्या धीरज देशमुखांना निवडणूक सोपी जावी म्हणून तर असे करीत नसतील ना अशीही चर्चा लातूर ग्रामीण मतदारसंघात जोर धरू लागली आहे.