लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आता 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. साहेबराव सावंत असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भागात शनिवारी मध्यरात्री साहेबराव सावंत यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आर्थिक व्यवहारासाठी दिलेले 9 लाख रुपये परत मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून साहेबराव सावंत तणावात होते. याच तणावातून त्यांनी ऑन ड्युटी असतानाच स्वतःवर गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला .
काय आहे प्रकरण?
साहेबराव सावंत यांनी आर्थिक व्यवहारासाठी दिलेले 9 लाख रुपये परत मिळत नसल्याने ते मानसिक तणावात होते. याच पैशांच्या मागणीवरून आरोपी आणि सावंत यांच्यात अनेकदा वादसुद्धा झाला. याच तणावातून साहेबराव सावंत यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
सुसाईड नोटवरुन 12 जणांवर गुन्हा
साहेबराव सावंत यांनी आत्महत्या करण्याअगोदर दोन पानांची एक सुसाईड नोट लिहिली होती. याच सुसाईड नोटवरून 12 जणांवर किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
नाईट ड्युटीवर गोळी झाडून आत्महत्या
साहेबराव सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घटनेच्या दिवशी ते नाईट ड्युटीवर होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी ठाण्यात ठेवलेल्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.
मूळ उस्मानाबादचे रहिवासी
साहेबराव सावंत हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी होते. त्यांच्या माघारी तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांनी आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून हि आत्महत्या केली आहे.