नवी दिल्ली । असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम कार्ड लाँच केले. केंद्र सरकारला ई-श्रम पोर्टलद्वारे असंघटित क्षेत्रातील 38 कोटी कामगारांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. अलीकडेच, ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या रजिस्ट्रेशनचा आकडा 10 कोटींच्या पुढे गेला आहे. हे पोर्टल असंघटित कामगारांचा पहिला नॅशनल डेटाबेस आहे.
रजिस्ट्रेशन कसे करावे ?
16 ते 59 वयोगटातील कामगार ई-श्रम पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) कार्ड मिळेल. आपले नावाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, कामगारांकडे आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. ज्या कामगारांकडे आधार लिंक केलेला मोबाईल नंबर नसेल तर ते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे करू शकतात.
ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणाऱ्या कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जाते. ई-श्रम कार्डमध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर असतो, जो देशभर वैध आहे. या कार्डच्या मदतीने कामगार देशात कुठेही आणि कधीही सर्व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ शकतात. http://eshram.gov.in नुसार, ई-श्रम कार्ड सर्वांसाठी फ्री आहे, मात्र कार्डवरील डेटा अपडेट करण्यासाठी 20 रुपये मोजावे लागतील.
रजिस्ट्रेशन मुळे ‘हे’ फायदे मिळतात
ई-श्रम कार्डच्या मदतीने कामगार देशात कुठेही आणि कधीही सर्व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ शकतात. इतर ठिकाणी गेल्यावरही ते सामाजिक सुरक्षा लाभांसाठी पात्र राहतात. यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये दिले जातील आणि तात्पुरते अपंगत्व आल्यास एक लाख रुपये दिले जातील.