औरंगाबाद – येत्या फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ दोन महिन्यांत समाप्त होत आहे. फेब्रुवारीतील या निवडणुकांची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध गटांतील आरक्षणाची सोडत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 21 मार्च 2022 ला समाप्त होत आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनीही आता आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व कामे मार्गी लागावीत, याकरिता पदाधिकाकरी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये चकरा मारत आहेत. याआधीच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी व नंतरच्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले होते. आता आगामी निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 15 दिवसांमध्ये आरक्षण सोडत काढली जाऊ शकते. तसेच अंतिम प्रभाग रचनेनुसार विविध गटांनी आरक्षण सोडत होईल, अशी माहितीही मिळाली आहे.
जिल्ह्यातील 62 गटांसाठी निवडणूक
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यातील 62 गटांसाठी निवडणूक झाली होती. अनुसूचित जाती-08, अनुसूचित जमाती- 03, ओबीसी प्रवर्गासाठी 17 गट राखीव होते. यात अनुसूचित जातीच्या महिलांकरिता 04, अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता 2, ओबीसी महिलांसाठी 9 तर सर्वसाधारण महिलांसाठी 16 जागा अशा प्रकारे महिलांसाठी 31 जागा राखीव आहेत. यंदाच्या निवडणुकीतदेखील महिलांच्या जागा जैसे थे असतील, मात्र ओबीसी आरक्षणाचे काय होणार, याकडे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.