टाळगावात गाईच्या कळपावर बिबट्याचा हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उंडाळे | टाळगाव (ता. कराड) येथे दिवानदरा नावाच्या शिवारात चरावयास गेलेल्या गीर गाईंच्या कळपावर दुपारी बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून चरावयास गेलेल्या जनावरांवर बिबट्या हल्ला करत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

कराड दक्षिणच्या डोंगरी भागात मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय चालतो. या विभागात घरटी दोन, चार जनावरे असून सर्व जनावरे डोंगर शिवारात चरावयास सोडली जातात; परंतु सोमवारी दुपारी अशोक कृष्णा सपकाळ यांच्या पाच ते सहा गीर गाईंसह वासरांना घेऊन दिवानदारा नावाच्या शिवारात ते गाई घेऊन गेले होते. यावेळी या गीर गाईंच्या कळपावर भरदुपारी बिबट्याने हल्ला केला. गीर गाईंचे वासरू बिबट्याने ठार केले. त्यामुळे पशुधन वाचवायचे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

या घटनेमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गीर गाईच्या वासराला बिबट्याने ठार केल्याची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक श्री. गुरव व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.