शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : मस्करवाडीत वैरण काढताना बिबट्या व बछडा शेतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उंब्रज भागात असलेल्या मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी कराड येथे काॅटेज हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेतात कडबा कापताना मादीने हल्ला केला आहे, बिबट्या मादीसोबत एक बिबट्याचे पिल्लू (बछडा) असल्याने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या उंब्रज परिसरातील मस्करवाडी येथे ही घटना आज (दि. 17) सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (वय- 55, रा. मस्करवाडी, ता. कराड) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बिबट्याने शेतकऱ्यांच्या हाताला चावा घेतला असून तोडावर नख्या उठलेल्या आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.

रामचंद्र सूर्यवंशी हे सकाळी नऊ वाजण्याच्या माऊली कडी नावाच्या शिवारात जनावरांसाठी वैरण आणण्यास गेले होते. कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या होता. त्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. सूर्यवंशी यांनी बिबट्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे चोरे येथील वनरक्षक ए. एम. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली.