औरंगाबाद जिल्ह्यात बिबट्याची दहशत; हल्ल्यात 2 ग्रामस्थ गंभीर जखमी

औरंगाबाद : जिल्हयातील वैजापूर तालुक्यातील वाकला येथील ऐतिहासिक घुमट परिसरात रविवारी बिबट्या आढळला. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात दोन गावकरी गंभीर जखमी झाले आहेत. बाळू शेजवळ, चंद्रकांत जाधव दोघेही (रा. वाकला ता. वैजापूर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले आहे.

ही घटना साधारणता अकरा वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला मदतीसाठी संपर्क केला असता बराच वेळ त्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कुणीही आले नव्हते. सकाळी 11 वाजता ही घटना घडली. त्यानंतर तब्बल तीन तासाने म्हणजेच अडीच वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाली.

मात्र दुपारपर्यंत वन विभागाचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे वन विभागाचा निष्काळजीपणा समोर येत आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You might also like