ठाणे प्रतिनिधी । नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदार संघात पन्नास टक्यापेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणूकीपेक्षा घसरली असल्याची चर्चा सुरू होती.
शनिवार रविवार नंतर सोमवारी झालेल्या मतदानामुळे अनेक मतदारांनी या काळात सहलीचा आनंद घेतला, तर काहीजणांनी गाव गाठले. नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ातील रहिवाशी मोठय़ा प्रमाणात राहात आहेत. तेथील नातेवाईकांनी केलेल्या आग्रहाला प्रतिसाद म्हणून अनेक मतदारांनी शनिवारीच गाव गाठलेले होते. कोकणातही मतदानासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षवेधी होती. नवी मुंबईतून खेड मतदार संघात मतदानासाठी जाणाऱ्या एका कुटुंबातील सहा जणांच्या श्रीकांत घाग यांच्या गाडीला माणगाव येथे अपघात झाला. ही मंडळी मतदानासाठी गावी जात असल्याचे समजते.
कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, तुर्भे या भागात माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. हा मतदार मोठय़ा प्रमाणात आपल्या गावाकडच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी गेल्याचे दिसून आले. त्यामुळे नवी मुंबईतील मतदाराच्या स्थलांतराचा मोठा फटका बसला आहे. काही सुशिक्षित मतदारांमधील मतदान करण्यातील उदासिनता आणि मतदान करुन उपयोग काय हा ईव्हीएम यंत्रणेवरील अविश्वास यामुळे नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघातील टक्केवारी घसरल्याची चर्चा आहे.